Pimpri : ब्लास्टिंगमुळे ग्रामपंचायत कार्यालयाला तडे

खालापूर : माणकीवली ग्रामपंचायत हद्दीत खडी तयार करणाऱ्या अनेक कंपन्या असून यासाठी गावाजवळील डोंगराळ जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू असतात. अंजरूण गावालगत असणाऱ्या खडी तयार करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या खडी मशीनच्या अशाच ब्लास्टिंगमुळे माणकीवली ग्रामपंचायत कार्यालयाला तडे गेले आहेत. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून सदर कंपनीच्या मालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
संबंधित कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे फक्त ग्रामपंचायत कार्यालय नाही तर गावातील काही घरांना देखील तडे गेले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने कंपनी मालकाला पत्र पाठविले असून ग्रामसभेस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तसेच कंपनीच्या खडीमशीन ब्लास्टिंगमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देखील देण्यात आली आहे. सदर कंपनी मालकावर कारवाई व्हावी व ब्लास्टिंग कायमचे बंद करावे यासाठी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
ब्लास्टिंगमुळे ग्रामपंचायत कार्यालयाला तडे गेल्याने यासंदर्भात सदर कंपनी मालकाला दोन वेळा पत्र पाठविले आहे. परंतु त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. कंपनीने ग्रामपंचायतीची तक्रार गांभीर्याने न घेतल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी वरीष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाईल. ब्लास्टिंग असेच सुरु राहिल्यास कार्यालयाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असून यातून मोठा धोका उद्भवू शकतो.
– सखुबाई कडाले, ग्रामसेविकाअंजरूण गावच्या हद्दीत असणाऱ्या खडी तयार करणाऱ्या कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्वच भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. यामुळे नव्याने बांधलेल्या इमारतीला धोका निर्माण झाला असून भिंती खराब झाल्या आहेत. गावातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. सदर खडीमशीन मालकाच्या मनमानी कारभारामुळे गावाचे नुकसान होत आहे. यामुळे महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
– बाळकृष्ण वाघमारे, सरपंच
माणकीवली ग्रामपंचायतीच्या कार्यालयासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर याठिकाणी नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात आले. परंतु आता काही महिन्यातच ब्लास्टिंगमुळे कार्यालयाला तडे गेल्याने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हैराण झाले आहेत. कार्यालयाचे नुकसान झाल्यानंतर लगेचच ग्रामपंचायतीने संबंधित कंपनी मालकाला पत्र पाठविले. परंतु त्यांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. कारण त्यानंतरही संबंधित कंपनीकडून ब्लास्टिंग सुरुच असून कार्यालयाची अधिक दुरावस्था होत आहे.





