कागदपत्रे नसतानाही होणार धान्य वाटप

पुणे – लॉकडाऊन काळात सर्वांना दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. मात्र, आता कागदपत्रे नसणाऱ्यांना देखील धान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी आता लाभार्थी निश्चित केले आहेत. 24 हजार 372 कुटुबांमधील 65 हजार 799 नागरिकांना गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
लॉकडाऊननंतर ग्रामीण भागात बाहेरील जिल्ह्यातील अनेक नागरिक अडकून पडले. त्यांच्याकडे रेशनकार्ड आहे; परंतु ते त्यांच्या जिल्ह्याचे असल्याने त्यांना त्याद्वारे पुणे जिल्ह्यात लाभ मिळत नव्हता. त्यासाठी कागदपत्रे नसलेल्या आणि रेशन खरेदी करू न शकणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यात सुमारे आठ दिवस सर्व्हेक्षणानंतर लाभार्थी निश्चित केले. तर, अद्यापदेखील काही नागरिकांचे अर्ज अपलोड करणे शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, परंतु तुर्तास सर्व्हेक्षण थांबवून, मंगळवार (दि.28) पर्यंतच्या आकडेवारीनुसार शुक्रवार (दि.1 मे) पासून प्रत्यक्षात धान्य वाटप करण्यास सुरुवात होणार आहे.





