पिंपरी | शाळांच्या वेळा बदलण्याचा जीआर अद्याप कागदावरच

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुर्व प्राथमिक विभागाच्या शाळांची वेळ बदलण्याचा राज्य शासनाचा अध्यादेश अद्याप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाला मिळाला नाही. त्यामुळे शहरातील शाळांची बदलण्याची कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे. शासनाकडून सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात आहे. प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने शाळांच्या वेळा बदलण्याचा जीआर अद्याप कागदावरच असल्याची वस्तूस्िथती पिंपरी-चिंचवड शहरात आहे.
राज्य सरकारने शाळांच्या वेळेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर किंवा नऊ वाजता भरवा, असा जीआर सरकारने जारी केला आहे. या निर्णयामुळे आता सर्व शाळांना या वेळेनुसार शाळा भरवणे सक्तीचे असणार आहे. राज्य सरकारने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुलांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागणार नाही.
यापूर्वी प्राथमिक शाळा सकाळी सात वाजता सुरू व्हायच्या. परिणामी विद्यार्थ्यांची झोप अपुरी राहत होती. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यावर होत असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले होते. त्यामुळे राज्य शासनाने या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एका भाषणामध्ये राज्यपालांनीच शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०८ प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये पुर्व प्राथमिक ते ४ थी पर्यंत सुमारे २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सकाळच्या शाळांची वेळ बदलल्यास या विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी उठण्याचा त्रास आणि अपुऱ्या झोपेची समस्या दुर होणार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला नाही.
शिक्षणमंत्र दीपक केसरकर यांनी पहिल्यांदा घोषणा केली. नंतर अध्यादेश जारी केला. मात्र हा अद्यादेशच प्राप्त झाला नसल्याने शाळांच्या वेळा बदलण्यात आला नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वेळा बदलण्याची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न आहे.
राज्य शासनाचा अध्यादेश जारी झाल्याची माहिती आहे. मात्र अद्याप आम्हाला अध्यादेशाबाबत तसेच वेळ बदलण्याबाबत सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी शाळांच्या वेळा बदलण्यात आलेल्या नाहीत. – विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, माध्यमिक शिक्षण विभाग.





