GPS Tracker : पंजाबमध्ये होणार आता कैद्यांचे जीपीएस ट्रॅकिंग
अमृतसर : मोठे ड्रग्ज तस्कर जामिनावर बाहेर येत असताना, या ड्रग्ज तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी पंजाब पोलिसांनी आता पहिल्यांदाच जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइसचा वापर करण्याची योजना आखली आहे. डीजीपी गौरव यादव यांनी पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, मोठे ड्रग्ज तस्कर बाहेर येताच पुन्हा या व्यवसायात सामील होतात.
अनेक वेळा जामिनाची मुदत संपल्यानंतर ते पुन्हा तुरुंगात पोहोचत नाहीत. ते नेपाळमार्गे परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न देखील करतात. अशा ड्रग्ज तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी, पोलिस त्यांना जीपीएस अँकलेट घालायला लावतील. हा अँकलेट हाताला किंवा पायाला घालतील. यामुळे पोलिस त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतील. जर तो जामीन संपल्यानंतर तक्रार करत नसेल तर त्याला पकडणे सोपे होईल.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी युएपीए कायद्यांतर्गत पकडलेल्या ४० कट्टर गुन्हेगारांवर या प्रकारचा प्रयोग केला. डीजीपी म्हणाले की अँकलेट घालण्यापूर्वी, या संदर्भात न्यायालयाची मान्यता घेतली जाईल आणि गोपनीयतेचे अधिकार राखले जातील. जेव्हा आरोपीने हा जीपीएस अँकलेट घातला असेल, तेव्हा जामिनाची मुदत संपल्यानंतरच पोलिस ते उघडू शकतील.
जर ड्रग्ज तस्कराने हा जीपीएस अँकलेट कोणत्याही प्रकारे उघडण्याचा, तोडण्याचा किंवा कापण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अलर्ट संदेश पंजाब पोलिसांच्या विशेष युनिटकडे जाईल. अँकलेट घालण्याची परवानगी घेताना, हे स्पष्टपणे नमूद केले जाईल की, जर ते उघडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न केला गेला, तर आरोपीचा जामीन रद्द मानला जाईल आणि त्याला पुन्हा अटक करून तुरुंगात पाठवले जाईल.





