जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होणार
जमीन मोजणीसाठी आता “कॉर्स’ यंत्रणा
सध्या 5 एकर जमीन क्षेत्र मोजण्यासाठी लागतो एक दिवस
पुणे – जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने “कॉर्स’ (कंतिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. “कॉर्स’ आधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेंकदात घेता येणार आहे. या सुविधेमुळे जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. सध्यस्थितीत पाच एकर जमिनीचे क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. तर कॉर्स जीपीएस रिंडीग लवकर मिळत असल्याने पाच एकरचे क्षेत्र मोजण्यासाठी फक्त अर्धातास लागणार आहे. त्यामुळे एका दिवसात 8 ते 10 मोजणीचे काम होऊ शकते. मोजणीमध्ये ही एक क्रांतिकारी योजना ठरणार आहे.
जमीन मोजणीसाठी ईटीएस मशीनच्या साहाय्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रिंडींग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रिडींग घेण्यासाठी किमान 1 तास ते 4 तास लागतात. जीपीएस रिंडींग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने “कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. “कॉर्स’ आधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेंकदात घेता येणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोर्स स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे व याद्वारे 77 ठिकाणी हे स्टेशन कार्यान्वित केले जाणार आहे यासाठी सर्व्हे इंडिया यांची मदत घेतली जाणार आहे. सद्यस्थितीत 45 ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. याचा उपयोग राज्य शासनाबरोबरच सर्व्हे ऑफ इंडियाला देशाचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे. सध्या कॉर्स पद्धतीचा वापर करून गावठाणांची मोजणी
होणार आहे.
… तर गैरप्रकाराला आळा बसेल
कॉर्स हे जीपीएस रीडिंग घेण्यासाठी भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान आहे. याद्वारे जीपीएस रिडींग घेण्यासाठी केवळ 30 सेकंद लागतात. यासाठी केवळ इंटरनेटची आवश्यकता आहे. इंटरनेट उपलब्ध असेल तर अचूक रिंडींग फक्त अर्धा मिनिटात मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत पारदर्शकता आणि गतिमानता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग गावठाण मोजणीबरोबरच जमीन मोजणीला होणार आहे. अक्षांक्ष रेखांश सापेक्ष मोजाणी झाली असल्याने आपली जमीन कधीही शोधता येईल. एका जमिनीची अनेक जणांना विक्री करण्याच्या गैरप्रकाराला आळा बसेल, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी दिली.