नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील महिलांना भाजपच्या नव्या सरकारकडून अर्थसहाय्य मिळण्याची प्रतीक्षा आहे. आता ते अर्थसहाय्य पुरवण्यासाठी सरकार सरसावले आहे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या महिलांची नोंदणी केली जाणार आहे. ती प्रक्रिया ८ मार्चपासून सुरू होईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने सत्ता मिळाल्यास महिला समृद्धी योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. त्या योजनेंतर्गत दिल्लीतील महिलांना दरमहा २ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध करण्याची हमी देण्यात आली. निवडणुकीत बाजी मारून भाजपने दिल्लीची सत्ता काबीज केली. त्या पक्षाचे सरकारही स्थापन झाले. मात्र, अद्याप महिला समृद्धी योजना लागू केली नसल्यावरून आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या आपने भाजपला घेरले आहे. ती टीका निष्प्रभ ठरवण्यासाठी भाजप सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. योजना लागू करण्याच्या उद्देशातून पात्र महिलांची नोंदणी केली जाणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारणपणे दीड महिन्याचा अवधी लागेल. संबंधित प्रक्रियेच्या माध्यमातून पात्र महिलांची यादी तयार केली जाईल. ती बाब विचारात घेता प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्यास दिल्लीतील महिलांना २ महिने प्रतीक्षा करावी लागू शकते.