मुंबई : बदलापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. मुंबई महानगरपालिकचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणी न केल्यासाठी त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांचे देखील निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षणाधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्ह उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, राजकीय पक्षांना बंदची हाक देता येत नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने बंदच्या निर्णयावर ताशेरे ओढत राजकीय पक्षांना इशाराच दिला होता. त्यानंतर, हा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष उद्या काळ्या फिती बांधून आंदोलन करणार आहेत.