Arsh Dalla Arrested : भारत सरकार करणार अर्श डल्लाच्या प्रत्यार्पणाची मागणी – रणधीर जयस्वाल

टोरोन्टो – कॅनडात अटक करण्यात आलेला खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग उर्फ अर्श डल्ला याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत सरकार करणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर अर्श डल्ला खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करत आहे. निज्जरसह डल्लाने त्याच्या स्लीपर सेल नेटवर्कद्वारे पंजाबमध्ये टार्गेट किलिंग, टेरर फंडिंगसाठी खंडणी यांसारखे अनेक गुन्हे केले आहेत.
रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्ही खलिस्तानी दहशतवादी अर्श डल्लाला कॅनडात अटक केल्याचे वृत्त पाहिले आहे. कॅनडाच्या प्रिंट आणि व्हिज्युअल मीडियाने या अटकेबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. आम्हाला समजले आहे की ओंटारियो कोर्टाने हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, अर्श डल्ला याच्यावर खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि दहशतवादी फंडिंग यासह दहशतवादाच्या प्रकरणांमध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मे 2022 मध्ये त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्याचे प्रत्यार्पण केले जाईल. कॅनडाच्या सरकारने अर्श डल्लाचे प्रत्यार्पण करावे, अशी अपेक्षा भारत सरकारने व्यक्त केली. अर्श डल्लाचा भारतातील गुन्हेगारी रेकॉर्ड आणि कॅनडातील अशाच प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये त्याचा सहभाग लक्षात घेता, त्याला भारतात न्याय देण्यासाठी प्रत्यार्पण केले जाण्याची अपेक्षा आहे.
भारताने कॅनडाला अर्शबद्दल दिली होती माहिती….
भारत सरकारने म्युच्युअल लीगल असिस्टन्स ट्रीटी (एमएलएटी) अंतर्गत अर्श डल्लाचा संभाव्य निवासी पत्ता, भारतातील आर्थिक व्यवहार, जंगम मालमत्ता, मोबाइल नंबर इत्यादींची माहिती कॅनडाला पाठवली होती. हे सर्व तपशील जानेवारी २०२३ मध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. डिसेंबर 2023 मध्ये कॅनडाच्या न्याय विभागाने या प्रकरणी अधिक माहिती मागवली होती. भारत सरकारने मार्च 2024 मध्ये उर्वरित माहिती दिली होती. आता त्याच्या अटकेनंतर भारतीय एजन्सी त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पुढे नेत आहेत.
Russia-Ukraine war : आम्ही रशिया-युक्रेन युद्ध संपवणारच – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अर्श डल्लाला 28 ऑक्टोबरच्या रात्री कॅनडात गोळी झाडण्यात आली होती. अर्श डल्ला हा त्याचा साथीदार गुरजंत सिंगसोबत कारमधून हॉल्टन परिसरातून जात होता. यावेळी गोळी डल्लाच्या उजव्या हाताला लागली होती. त्यानंतर डल्ला आणि गुरजंत सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर डल्लाने पोलिसांना त्याच्यावरील हल्ल्याची खोटी कहाणी सांगितली. त्याच्या अटकेनंतर कॅनडाच्या पोलिसांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.





