UPS: बजेटपूर्वी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन पेन्शन योजना

Unified Pension Scheme: केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पापूर्वी मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने नवीन पेन्शन योजना ‘यूपीएस’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. युनिफाइड पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, ही योजना कधीपासून लागू होईल याची देखील माहिती देण्यात आली आहे.
सरकारने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये या योजनेची घोषणा केली होती. केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत (NPS) अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चा पर्याय दिला आहे. राज्य सरकारे देखील ही योजना लागू करू शकतात.
कधीपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन योजना?
सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या नवीन पेन्शनची घोषणा केली होती. आता सरकारने 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होणार असल्यासंदर्भातची अधिसूचना जारी केली आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) यामध्ये संतुलन राखत नवीन योजना सादर करण्यात आली आहे.
युनिफाइड पेन्शन योजनेचा कोणाला होणार फायदा?
युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल. जे कर्मचारी एनपीएसचा लाभ घेत आहेत, ते त्या योजनेंतर्गत यूपीएसचा पर्याय निवडू शकतात. किंवा यूपीएस न निवडता एनपीएसचा लाभ घेणे सुरू ठेवू शकतील. या नवीन योजनेचा लाभ जवळपास 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
युनिफाइड पेन्शन योजना नक्की काय आहे?
युनिफाइड पेन्शन योजनेंतर्गत 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन स्वरुपात दिली जाईल. तसेच, 10 वर्षांच्या नोकरीनंतर निवृत्ती स्विकारल्यास महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन दिली जाईल.
एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शनची 60 टक्के रक्कम दिली जाईल. तसेच, महागाई वाढल्यास पेन्शनच्या रक्कमेतही वाढ होईल. सध्या एनपीएसचा लाभ घेत असलेले सर्व कर्मचारी युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात.





