गौप्यस्फोट! “ठरलंय, राज्यपाल ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या 12 नावांची यादी फेटाळणार”

कोल्हापूर – विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांवर कोणाची वर्णी लागणार, अशी उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येणाऱ्या 12 जागांच्या शिफारशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी फेटाळणार आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनय कोरे यांना सांगितली आहे, असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. त्यात कला, साहित्य, विज्ञान, सहकारी चळवळ व सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती राज्यपाल करू शकतात.
सहसा मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावं राज्यपाल स्वीकारत असतात. मात्र, महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संबंध पाहता ते सहजासहजी नावं स्वीकारणार नाहीत अशी चर्चा सुरू आहे.





