राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत – मंत्री यशोमती ठाकूर

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलंय. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे, असं मत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.
मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणारं भाषण करायचंच नव्हतं असं दिसतंय. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत, अशी टीका देखील त्यांनी केली.
पुढे मंत्री ठाकूर म्हणाल्या की, नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार विरोधी पक्षाला नाही. जर नैतिकता शिल्लक असेल तर शेतकऱ्यांवर गाडी घालणाऱ्या मुलाला वाचवणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा मागा. मध्यप्रदेश मध्ये आयएसआय (ISI) ला मदत करणाऱ्या संघ कार्यकर्त्याचं पुढे काय झालं, इक्बाल मिर्ची शी संबंधित कंपन्यांकडून भाजपने 20 कोटी देणगी घेतल्याच्या बातम्या आल्या त्याबद्दल काय भूमिका आहे? या वर ही विरोधी पक्षाने बोललं पाहिजे. दहशतवाद्यांशी संबंध कुणाचा आहे हे सर्वांना माहितीय. मालेगाव-नांदेड अजून लोकं विसरली नाहीत, असं देखील मंत्री यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.





