Satish Bhosale : सतीश भोसले भाजपचा कार्यकर्ता नाही? भाजपचं स्पष्टीकरण

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर खोक्या चांगलाच चर्चेत आला आहे. आता त्याचे एक-एक कारनामे पुढे येत आहेत.
पोलीस आणि वनविभागाच्या पथकाकडून त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून जनावरांचे सुकलेले मांस आणि शिकारीसाठी वापरत असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर आता खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे, जातीची खोटी माहिती सांगून सतीश भोसले याने भजपकडून पद मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
सतीश भोसलेनी तत्कालीन भाजपचे भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भाजप भटक्या विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पद घेतले होते. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे, तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो, भटकायुक्त प्रवर्ग वेगळा आहे. तरीसुद्धा त्याने चुकीची माहिती सांगून भटक्या विमुक्त प्रवर्गातून पद घेतले होते. मला ते कळल्यानंतर 2021 सालीच मी त्याची पदावरून हाकालपट्टी केली होती, असे भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी म्हटले आहे.
शिरूर शहर बंदची हाक
बीडच्या शिरूरकासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि खोक्याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच येथील पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी झाले आहेत. सकाळी 9 वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला आहे. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.
सतीश भोसलेने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.





