ladki bahin yojana : 92 लाख लाभार्थ्यांना वगळल्यानंतर सरकारचा दुसरा मोठा निर्णय; एकनाथ शिंदेंची ‘ही’ योजना केली बंद
ladki bahin yojana : या निर्णयानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

ladki bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल ९२ लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आले होते. या निर्णयानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठीची मोफत साडी योजना बंद करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी केला आहे.
राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत जून २०२३ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी दिवाळीनिमित्त यंत्रमागावर विणलेली एक साडी मोफत देण्यात येत होती.
या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना वस्त्र उपलब्ध करून देणे एवढाच नव्हता, तर राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना देणे हाही त्यामागील महत्त्वाचा हेतू होता. राज्यातील सुमारे २५ लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत होता. ही योजना बंद करण्यात आल्याने या लाभापासून अनेक कुटुंबाना वंचित राहावे लागणार आहे.
आर्थिक भार लक्षात घेऊन योजना बंद
मोफत साडी योजनेसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०२३, २०२४ आणि २०२५ या सलग तीन वर्षांत लाभार्थ्यांना साड्यांचे वितरण करण्यात आले. मात्र, वाढता आर्थिक भार लक्षात घेऊन आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २०२६ मध्ये दिवाळीनिमित्त मोफत साड्यांचे वितरण होणार नसल्याची माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत कपात आणि त्यानंतर मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा रंगली आहे. तसेच विरोधकांकडून देखील सरकारवर टीका केली जाऊ शकते. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकृत प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vivek Oberoi: “मी अभिनेता आहे, नेता नाही”; सोनम वांगचुकांवरील प्रश्नावर विवेक ओबेरॉयंची भूमिका





