Delhi Pollution : दिल्लीत प्रदूषणविरोधात सरकारचा नवा प्लॅन; लाँच केली नवीन योजना, जाणून घ्या….

Delhi Pollution । Rekha Gupta – राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहे. विधानसभा निवडणुकीतही प्रदूषणाचा मुद्दा जोरकसपणे उपस्थित करण्यात आला होता. तो कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, दिल्लीच्या रेखा गुप्ता यांच्या सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी ‘वायू प्रदूषण शमन योजना २०२५’ लाँच केली आहे. या अंतर्गत, प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत.
अलीकडेच दिल्लीतील भाजप सरकारचा १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, स्वच्छ आणि निरोगी दिल्ली हे त्यांच्या सरकारचे स्वप्न आहे. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो.
दिल्ली सरकारच्या वायू प्रदूषण शमन योजना २०२५ अंतर्गत, राजधानी दिल्लीतील मेट्रो स्थानकांवर २३०० इलेक्ट्रिक ऑटो तैनात केल्या जातील. याशिवाय, वायू प्रदूषणाच्या बाबतीत १३ सर्वात संवेदनशील भागात मिस्ट स्प्रेअर बसवले जातील. त्याच वेळी, दर सहा महिन्यांनी पीयूसीसी केंद्रांचे ऑडिट केले जाईल.
मुख्यमंत्री म्हणाल्या की, शुद्ध हवा सबका अधिकार-प्रदूषण पर जोरदार प्रहार या योजनेत एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण देखील समाविष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत सरकारने यावर्षी ७० लाख रोपे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान मोदींनी एक पेड माँ के नाम मोहीम सुरू केली होती.
दरम्यान, वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सरकार स्मार्ट इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टम सुरू करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, १ नोव्हेंबरपासून दिल्लीत फक्त बीएस-६, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनीच प्रवेश करावा अशी आमची इच्छा आहे. तसेच ज्या प्रकल्पांचे बांधकाम स्थळ ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त आहे त्यांना दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (डीपीसीसी) च्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.





