पुणे | गुन्हेगारी वाढण्यास शासन जबाबदार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात महिला, अल्पवयीन मुले, दलितांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ पुण्यात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
राज्यात महिलावरील अत्याचार राजरोस सुरू आहेत, दलित समाजावर गावागावांत आत्याचार होत आहेत. राज्यात कायदाचा धाक राहिला नाही. या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मातंग एकता आंदोलनच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या भवानी पेठेतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या आंदोलनात मातंग एकता आंदोलनचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे, झैनाब रमेश बागवे, महिला अध्यक्षा ॲड. राजश्री अडसूळ, विठ्ठल थोरात, बापू दाखले, सुरेखा खंडागळे, संजय अल्हट, यादवराव सोनावणे, अनिल हतागळे यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.



