पुणे | पुण्यात उद्या जनआक्रोश मोर्चा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील विविध घटनांच्या निषेधार्थ मातंग एकता आंदोलनाच्या वतीने पुण्यात दि. १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या मोर्चाचे नेतृत्त्व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे करणार आहेत. संघटनेच्या पुणे अध्यक्षा राजश्री अडसूळ, विठ्ठल थोरात यावेळी उपस्थित होते. बागवे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महिला तसेच दलितांवर अत्याचाराच्या घटना लक्षणीय वाढल्या आहेत.
त्यातच या आरोपींना कायद्याचा धाक नसल्याने तसेच त्यांना पाठीशी घात जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणि महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे.
राजकीय दबावापोटी काही अधिकारी आपल्या पीडित कुटुंबांची हेळसांड, अरेरावी करून उलटपक्षी पीडित कुटुंबालाच कायद्याची भीती दाखवून,
त्यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवतात. ही प्रवृत्ती रोखण्याकरिता अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे, असे बागवे म्हणाले.

