Badlapur School: “सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न”; राज ठाकरेंचा सणसणीत सवाल

Badlapur School | Ladki Baheen | Raj Thackeray | Eknath Shinde : बदलापूरमध्ये बालवाडीतील दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे रोखून धरली. शाळेची तोडफोड करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
याठिकाणची इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे. त्यातच या प्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटकदेखील केली आहे.
दरम्यान, कालपासून घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर करत शिंदे सरकारला थेट धारेवर धरलं आहे.
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2024
राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे.
पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे.
माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.





