Walhekarwadi: वाल्हेकरवाडीत ‘शासन आपल्या दारी’ शिबिर
Walhekarwadi : शिधापत्रिका, महसूल व विविध योजनांच्या सेवांचा नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वाल्हेकरवाडी येथे बुधवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ तसेच ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत नागरिकांसाठी विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांची कामे एकाच ठिकाणी करून देण्यावर भर देण्यात आला.
शिबिरामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसूल विभाग, संजय गांधी निराधार योजना, आधार सेवा, तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या परिसरातच सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विशेष म्हणजे, शिधापत्रिका कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा मोठ्या प्रमाणात लाभ नागरिकांनी घेतला. नवीन शिधापत्रिका, नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे, नावातील दुरुस्ती, शिधापत्रिकेतील माहिती अद्ययावत करणे, आधार कार्डाशी संबंधित सेवा, ई-केवायसी, तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय उत्पन्न, जाती, रहिवासी दाखले, ऑनलाइन सातबारा, फेरफार उतारा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड यांसारख्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या.शिबिरात दिव्यांग, विधवा महिला, निराधार, ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांची अर्ज प्रक्रिया जागेवरच पूर्ण करण्यात आली, तर काही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी स्वीकारण्यात आली.
विविध विभागांना एकाच छताखाली आणून नागरिकांची कामे सुलभ पद्धतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसादही समाधानकारक मिळाल्याचे दिसून आले. या शिबिराला स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे आणि योजनांबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा:
PMC News: भाजप-राष्ट्रवादीचे बिनसले! महापालिकेत दिवसभर हातात हात, सायंकाळी सभेत जोरदार वाद





