मोठी बातमी: पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत; मृतांच्या वारसांना 4 लाख, जनावरांसाठी 37 हजार, शेळी-मेंढी….

सोलापूर : यंदाच्या मुसळधार पावसाने आणि महापुराने राज्यात हाहाकार माजवला असून, जूनपासून आतापर्यंत 84 जणांचा बळी गेला आहे. अनेकांची घरं वाहून गेली, हजारो घरांची पडझड झाली. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने मदतकार्य सुरू केले असून, जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार देण्यात आले आहेत. निधीअभावी मदत थांबणार नाही यासाठी उणे बजेटमधूनही तरतूद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
मृतांच्या वारसांना 4 लाख, जनावरांसाठी आर्थिक मदत –
शासनाने पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक मदतीची तरतूद जाहीर केली आहे. पूरामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, दुधाळ जनावर दगावल्यास 37,500 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये, तर लहान जनावरांसाठी 20,000 रुपये दिले जाणार आहेत. शेळी, मेंढी, बकरे यांच्यासाठी प्रत्येकी 4,000 रुपये, तर कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये (जास्तीत जास्त 10,000 रुपये) मदत मिळणार आहे. घरांच्या पडझडीसाठी झोपडीसाठी 8,000 रुपये, पक्क्या घराच्या संपूर्ण नुकसानीसाठी 12,000 रुपये आणि गोठ्यासाठी 3,000 रुपये देण्याची तरतूद आहे.
शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई –
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठीही शासनाने भरपाई जाहीर केली आहे. कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर अशी मदत मिळेल. पूरामुळे जमीन खरडून गेल्यास दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनींसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर, तर दुरुस्त न होणाऱ्या जमिनींसाठी किमान 5,000 रुपये आणि कमाल 47,000 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल.
सांगोला तालुक्यात 4 कुटुंबांना 16 लाख –
सांगोला तालुक्यातील चार मृत्यूंसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 16 लाख रुपयांची मदत पाठवली असून, त्यापैकी तीन कुटुंबांच्या बँक खात्यांत रक्कम जमा झाली आहे. चौथ्या कुटुंबाला लवकरच मदत मिळेल, अशी माहिती प्रशासनाने दिली. सांगोला तालुक्यातील माहीम येथील कासाळ ओढ्यात तन्मय रविकिरण ऐवळे (वय 7) आणि सोमनाथ विठ्ठल ऐवळे (वय 13) या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत.
शासनाने तातडीने आर्थिक सहाय्य सुरू केल्याने पूरग्रस्तांना दुःखाच्या काळात काहीसा दिलासा मिळाला आहे. पंचनामे आणि नुकसान पाहणी दौरे जोरात सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागांतील नागरिकांनी शासनाच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे.
मदत तुटपूंजी –
प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा असताना अत्यंत तुटपूंजी मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.





