पुणे | धार्मिक, सामाजिकदृष्ट्या गोशाळा महत्त्वाच्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बदलत्या काळात सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात घेता गोशाळा आणि त्यातून निर्माण होणारे शेणखत आणि अन्य उपपदार्थ हे जमिनीचा आणि अन्नपदार्थांचा कस वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन स्टेटस हेल्थ क्लबच्या संचालक डॉक्टर सुमेधा भोसले यांनी केले.
वसुबारसेच्या निमित्ताने विश्वकर्मा फाउंडेशनच्या वतीने जामगाव (ता. मुळशी) येथे चालवल्या जाणाऱ्या कपिला गोशाळेत गो पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे होते.
धार्मिक, तसेच सामाजिकदृष्ट्या गोशाळा महत्त्वाच्या असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर रवींद्र आचार्य यांनी सांगितले, की आगामी काळात गोशाळेची व्याप्ती २०० गाईंपर्यंत वाढवून संपूर्ण गावाला पाइपलाइनद्वारे स्वयंपाकासाठी इंधन पुरवठा करण्याची योजना आहे.
कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ ठोंबरे, जामगावचे सरपंच विनोद सुर्वे, ट्रॉन्सॉफ्टेकचे संचालक सुशांत गोरे यांनी या वेळी गोशाळेच्या कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. फाउंडेशनच्या खजिनदार प्रिया बेल्हेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सचिव आदर्श केदारी यांनी आभार मानले. सहसचिव सुहास यादव यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी गोशाळेच्या विस्तारीत कामाचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.





