Pune : शिक्षण धोरणाचे व्यक्तिमत्त्व विकास हे उद्दिष्ट

पुणे : मुलांमधल्या मूळ गुणांना न्याय देऊन त्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणे, हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विद्या भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे शिक्षण परिषदेचे उद्घाटन भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सचिव डॉ. आनंद काटीकर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, विद्या भारती संस्थेचे महाराष्ट्र प्रांत संचालक अरुण कुलकर्णी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रांत येत्या काही वर्षांत आमूलाग्र बदल होणार आहेत. त्या बदलांसाठी समाजाची तयारी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरणातील राज्य अभ्यासक्रम आराखड्याची सर्वांगीण चर्चा करण्यासाठी केलेल्या या परिषदेला अत्यंत महत्त्व असल्याचे भोयर यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची सांगड भारतीयीकरणाच्या प्रक्रियेशी घालण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कुलकर्णी यांनी या वेळी केले. डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्या भारती पुणे शाखेचे अध्यक्ष रघुनाथ देविकर यांनी आभार मानले.





