भ्रष्ट राजकारण्यांवर धडक कारवाई करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – हिंदी चित्रपटात इमानदार अधिकारी असलेल्या नायकाचा जेव्हा कोणाला त्रास होऊ लागतो तेव्हा ते त्याला भ्रष्ट करण्याचा, विकत घेण्याचा प्रयत्न करतात. तरीही तो बधला नाही तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला लक्ष्य केले जाते. हे सांगायचे कारण म्हणजे अगदी तशीच घटना गोरखपूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर घडली आहे.
दिल्लीला परत जात असलेले सीबीआयचे उपअधिक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव यांची स्कॉर्पिओ गाडी ट्रकने उडवून देण्याचा प्रकार घडला आहे. यात श्रीवास्तव यांच्या गाडीची एक बाजू पूर्ण निकामी झाली असली तरी ते त्यांच्या वाहनचालकांच्या तत्परतेमुळे बचावले आहेत. मात्र, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रकचालकाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
श्रीवास्तव यांची ओळख म्हणजे राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित अनेक हाय प्रोफाईल प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा चारा घोटाळा, भर्ती घोटाळा, माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांच्याशी संबंधित दाखल झालेले भ्रष्टाचाराचे गुन्हे आणि अनेक राज्यांच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा समावेश आहे.
चिदंबरम यांना अटक झाली होती. ती अटक रूपेश कुमार श्रीवास्तव यांनीच केली होती. त्यामुळे आता श्रीवास्तव यांच्यावरील हल्ल्यामागे कोणते कटकारस्थान आहे का, या दिशेने तपास केला जातो आहे. अपघाताची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.





