गुगलची 87,520 कोटींची गुंतवणूक : विशाखापट्टणम बनेल देशातील पहिले ‘एआय सिटी’, दोन लाख रोजगारांची निर्मिती

नवी दिल्ली – आंध्र प्रदेश सरकारने विशाखापट्टणम शहराला एआय सिटी म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुगल कंपनी विशाखापट्टणम येथे 10 अब्ज डॉलरची म्हणजे 87, 520 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून गुगल एक गिगावॅट हायपर स्केल डेटा सेंटर विशाखापट्टणम मध्ये विकसित करणार आहे.
या संदर्भातील सामंजस्य करावरावर 14 ऑक्टोबर रोजी स्वाक्षर्या केल्या जाणारा असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव इत्यादी उपस्थित राहणार आहेत. हे डेटा सेंटर उभारण्यासाठी केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांना काही सवलती द्याव्यात यासाठी आंध्र प्रदेश सरकारने पुढाकार घेतला होता. केंद्र सरकारने चंद्राबाबू नायडू यांची सूचना मान्य केल्यामुळे हा विशाल प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये विकसित होणार आहे.
या प्रकल्पात प्रत्येक वर्षाला जवळ जवळ दोन लाख इतके उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोजगार निर्माण होणार आहे. त्याचबरोबर भारत माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात या प्रकल्पामुळे जगाच्या सोबत राहण्यास मदत होणार असल्याचे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.
हा प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि केंद्र सरकार दरम्यान कसलेही राजकीय वितृष्ट नसल्याचे स्पष्ट होत आहे. या दृष्टिकोनातूनही या प्रकल्पाला महत्त्व देण्यात येत असल्याचे समजले जाते. विशाखापट्टणम मध्ये नोव्हेंबरमध्ये टीसीएस कंपनी आणि डिसेंबरमध्ये कॉग्नीझंट कंपनी आपले प्रकल्प जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





