अंद्रोथ पाणबुडीविरोधी युद्धनौका नौदलात होणार दाखल

नवी दिल्ली : अंद्रोथ ही भारतीय नौदलाची दुसरी अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका दिनांक ६ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत नौदलात सामील होणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय नौदलात सामील होणार असलेल्या अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील १६ युद्धनौकांपैकी हे दुसरे जहाज औपचारिकरित्या नौदलात सामील होणार आहे.
अंद्रोथ या युद्धनौकेची बांधणी कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने केली आहे. या जहाजासाठीचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम हे स्वदेशी घटकांसह झाले आहे. अंद्रोथ हे नाव लक्षद्वीप द्वीपसमूहातील अंद्रोथ बेटावरून दिले गेले आहे. यापूर्वी आयएनएस अंद्रोथ या नावाने कार्यरत असलेली युद्धनौका २७ वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा करून नौदलातून निवृत्त झाली होती.
नवीन अंद्रोथच्या नौदलातील समावेशामुळे तिच्या आधीच्या युद्धनौकेचा वारसा आणि भावना कायम राखली जाणार आहे. प्रगत शस्त्रे आणि संवेदक प्रणाली, आधुनिक दळणवळण यंत्रणा आणि वॉटरजेट प्रणोदनाने सुसज्ज असलेली अंद्रोथ ही युद्धनौका, पाण्याखालील धोके अचूकपणे शोधून काढण्याच्या, त्यांचा मागोवा घेण्याच्या आणि त्यांना निष्क्रिय करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे. या युद्धनौकेच्या अत्याधुनिक क्षमतांमुळे सागरी पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्ये आणि किनारपट्टी संरक्षण मोहिमांसारखी विविध प्रकारची कार्ये पार पाडण्यासही ती सक्षम आहे.





