Google AI data center: गुगलकडून विशाखापट्टणममध्ये 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक; देशात उभे राहणार 1 गिगावॅटचे एआय डेटा सेंटर

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना अमेरिकेतच प्रकल्प उभारण्याचा आग्रह केला आहे. तरीही गुगल कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे तब्बल 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी पायाभूत सुविधा उभारणारे संकुल उभारणार आहे. यामध्ये 1 गिगा वॅट क्षमतेच्या डेटा सेंटरचा समावेश आहे.
यातून प्रत्यक्ष सहा हजार तर अप्रत्यक्ष तीस हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. हे रोजगार उच्च तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अभियंत्याचे असणार आहेत. यासाठी भारतात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे हा प्रकल्प भारतात उभारला जात असल्याचे कंपन्याने सांगितले.
गुगलचे अमेरिकेबाहेर हे सर्वात मोठे काम आहे. या प्रकल्पासाठी स्वच्छ ऊर्जेचा आणि फायबर ऑप्टिक नेटवर्कचा वापर केला जाणार आहे असे गुगल क्लाऊड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस कुरीयन यांनी सांगितले. अमेझॉन डॉट कॉम कंपनी क्लाऊड पायाभूत सुविधांसाठी 12.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
तर ओपन ए आय कंपनी याच भागात एक गिगावॅटचे डेटा सेंटर उभारणार आहे. भारतातील इंटरनेट वापरणार्यांची संख्या 100 कोटी आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनी या क्षेत्रात बलाढ्य प्रकल्प उभारणार आहे. अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी, रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनीही डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला आघाडीवर ठेवण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करण्याचे अगोदरच जाहीर केले आहे.
डेटा सेंटरमध्ये होत असलेली ही गुंतवणूक पाहता भारतातील डेटा सेंटर बाजारपेठ 2027 पर्यंत 100 अब्ज डॉलरची होणार आहे. डेटा सेंटरसाठी यावर्षी गुगलने 85 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. त्यातील 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक एकट्या भारतात होणार आहे. या घडामोडी बद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानात भारत अग्रेसर राहणार आहे. हे तंत्रज्ञान भारतातील सर्वसमान्यांना उपलब्ध होईल. त्यामुळे सर्वसामान्यांची उत्पादकता वाढून भारत विकसित होण्यास मदत होईल.
डेटा म्हणजे आधुनिक क्रूड ऑइल –
आंध्रचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश म्हणाले की, डेटा आधुनिक क्रूड ऑइल आहे आणि डेटा सेंटर आधुनिक तेल शुद्धीकरण केंद्र आहेत. आंध्र प्रदेशात 2030 पर्यंत सहा गिगा वॅट क्षमतेची डेटा सेंटर उभारली जातील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या घडामोडीबद्दल आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन केले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानात आंध्र प्रदेश पुढे जात असल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाधान व्यक्त केले.





