जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन कमी झाल्याने भारतीय साखरेला चांगला भाव

मुंबई – ऊस उत्पादक आणि साखर उत्पादकांना या वर्षी बऱ्यापैकी फायदा होण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे भारतीय साखरेला चांगला भाव मिळणार आहे. यावर्षी साखर निर्यात वाढेल. देशांतर्गत मागणीवर कसलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे साखर कारखान्याकडील अतिरिक्त साखर साठा या वर्षी कमी होईल. त्याचबरोबर साखर कारखान्यांना साखर कमी दरात निर्यात करण्याची गरज भासणार नाही.
भारत अनेक वर्षापासून आवश्यकतेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन करीत आहे. मात्र जागतिक बाजारात साखरेला चांगला भाव मिळत नसल्यामुळे अनेकदा सरकारलाही साखर निर्यात करण्यासाठी अनुदान द्यावे लागते. अशा परिस्थितीमध्ये कारखान्यांच्या नफ्यावर काही प्रमाणात मर्यादा येतात.
आता साखर कारखान्यावरील कर्जाचा बोजा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे ईक्रा या संस्थेच्या अभ्यास अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ईक्रा या संस्थेचे उपाध्यक्ष सव्यसाची मुजुमदार यांनी सांगितले की वाणिज्य मंत्रालयाने भारतातील अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेगात केल्या आहेत. त्यामुळे भारताची साखर चांगल्या दरावर वर निर्यात होण्यास मदत होणार आहे.
दरम्यानच्या काळामध्ये भारतामध्ये इथेनॉलची निर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हे इथे इंधनामध्ये मिसळले जात आहेत. त्यामुळेही साखर कारखान्यांना दीर्घ पल्ल्यात अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांच्या नफ्यामध्ये 12.7 ते 13.7 टक्के वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व घटनाक्रमामुळे भारतातील साखरेचे दर आगामी काळामध्ये थोडेसे वाढून 35 रुपये ते 37 रुपये प्रति किलो या पातळीवर जाण्याची शक्यता या संस्थेला वाटते. भारतीय साखर कारखान्यांनी अगोदरच 65 लाख टन साखरेच्या निर्यातीचे व्यवहार केले आहेत. रशिया व युक्रेन हे दोन देश वगळता इतर देशांना साखर निर्यात करण्यात आता सध्या तरी कसलीही अडचण नाही.




