Maharashtra Rain Update : गुड न्यूज! ‘या’ तारखेपासून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यातील अंदाज काय?
Maharashtra Rain Update : २० ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता पावसासंदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असून, २० ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आगामी काळातील पावसाची स्थिती स्पष्ट केली. त्यानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता असून, अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचे दमदार कमबॅक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान पावसाचा अंदाज
१९ ते २२ सप्टेंबरदरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताआहे. तसेच २१ सप्टेबर रोजी नाशिक जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २२ सप्टेंबरला मराठवाड्यात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
परभणीत जवळपास ४० दिवसांनंतर पावसाची हजेरी
दरम्यान, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाला. पहाटेपासून परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची संततधार सुरू असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे.
धाराशिवमध्ये पावसाची हजेरी
धाराशिव जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून पावसाची प्रतीक्षा होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असतानाच मध्यरात्री जिल्ह्यातील काही भागांत हलका पाऊस झाला. गौराईच्या आगमनासोबत पावसानेही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
लातूरकरांना उकाड्यातून दिलासा
लातूर शहर आणि परिसरातही दीड महिन्याच्या मोठ्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली. रात्री दीड वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या लातूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हिंगोलीत जोरदार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
हिंगोली जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र गणरायाच्या आगमनासोबतच वरुणराजानेही हजेरी लावली आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.





