प्रभात वृत्तसेवा पुणे – पीएमपीच्या पर्यटन बससेवेला पुणेकरांसह राज्य आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या पानशेत, वरसगाव धरणक्षेत्र परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत असून, तेथेही पर्यटन बस वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे पर्यटकांची अधिक सोय होईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.पीएमपीकडून शहराच्या चारही दिशांना पर्यटनस्थळांसह देवदर्शनासाठी बससेवा सुरू केली आहे. त्यामध्ये लाेणावळा, रांजणगाव गणपती, बनेश्वर मंदिर, यमाई माता मंदिरासह इतर ठिकाणी पर्यटन बससेवा सुरू आहे. याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरसगाव, पानशेत या भागांत पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा परिसर निसर्ग साैंदर्याने नटलेला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये याठिकाणी भेटी देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, पीएमपीची डोंगराळ भागात पर्यटन सेवा सुरू आहे. पीएमपी ताफ्यात बससंख्या कमी असल्याने या भागात कमी बस धावतात. पुढील दोन ते तीन महिन्यांत नवीन बस दाखल होणार आहेत. त्यानंतर वरसगाव, पानशेत या परिसरात पीएमपीकडून नव्या पर्यटन बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. शहरातील विविध ठिकाणावरून या बस सोडण्यात येणार आहेत. यामुळे पुणेकरांसह ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. “पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत्या काही दिवसांत नवीन पर्यटन बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या पर्यटन बस शहरातील विविध ठिकाणांवरून सोडण्यात येणार आहे. त्याचा फायदा पीएमपी आणि पर्यटक या दोघांनाही होणार आहे.” – पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीएमपी