मुंबई : मुंबईमध्ये आपलं एक घर असावे असे प्रत्येकाला वाटतं. मात्र आज घराच्या वाढत्या किंमती पाहता प्रत्येकाला घर घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडाच्या घरांवर अवलंबून असतात. म्हाडाने 2024 मध्ये घरांची लॉटरी काढली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा म्हाडा लॉटरी काढणार आहे. म्हाडा सुमारे तीन-चार हजार घरांची लॉटरी काढणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बांधकाम सुरू असतानाच लॉटरी काढून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने विजेत्यांना टप्प्याटप्प्याने घरांचे पैसे भरता येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2024 मध्ये 2020 घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला तब्बल एक लाख 13 हजार अर्ज आले होते, म्हणजे एका घरासाठी 55 अर्ज एवढी स्पर्धा होती, त्याची दखल घेत म्हाडाने नव्या वर्षात पुन्हा लॉटरी काढण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे. मुंबईत सध्या म्हाडाकडे तयार घरांची किंवा ओसीपर्यंत आलेल्या घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांमधील घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांनी 25 टक्के रक्कम भरल्यानंतरच गृहकर्जासाठी म्हाडाकडून एनओसी मिळते. आता ग्राहकांना टप्प्याटप्प्याने पैसे भरता येणार आहेत. घरांची लॉटरी काढताना ही घरे कधीपर्यंत पूर्ण होतील, घराचा ताबा कधी मिळेल, याबाबतची माहिती समोर ठेवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना घरासाठी अर्ज करणे शक्य होणार आहे.