मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधीच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. गणेशोत्सवात आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, यामुळे सरकारी नोकरदारांचा उत्साह द्विगुणीत होईल. राज्य सरकारने यासंदर्भात शासकीय निर्णय जारी करत 1 सप्टेंबर ऐवजी 26 ऑगस्ट रोजी पगार वितरणास मान्यता दिली आहे. हा निर्णय जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, अकृषी विद्यापीठे, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांतील अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू राहणार आहे. यामुळे या सर्वांना गणेशोत्सवाच्या खर्चासाठी आर्थिक बळ मिळणार असून, सणाचा आनंद अधिक खुलणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीचा दिलासा – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. या दोन्ही निर्णयांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढणार असून, सरकारी कर्मचारी आणि गणेशभक्तांना सण साजरा करण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे.