नवी दिल्ली – केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता डीए/डीआर ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लागू केली असून १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ५०,००० असेल, तर आधी त्याला ५३% प्रमाणे २६,५०० डीए मिळत होता. आता ५५% प्रमाणे २७,५०० मिळेल. म्हणजेच १,००० वाढ. ७०,००० बेसिक सॅलरीवर आधी ३७,१०० डीए मिळत होता, तो आता ३८,५०० होईल. म्हणजे १,४०० वाढ. १,००,००० बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याला आता ५५,००० डीए मिळेल. गेल्या सहा-सात वर्षांत डीएमध्ये सामान्यत: ३% किंवा ४% वाढ केली जात होती. मात्र, ७८ महिन्यांमध्ये प्रथमच डीएमध्ये केवळ २% वाढ करण्यात येत आहे. यापूर्वी २०१८ मध्येच अशा प्रकारची २ टक्क्यांची वाढ झाली होती. दरम्यान, मार्चमध्ये हा निर्णय घोषित झाल्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ या दोन महिन्यांचा एरिअर देखील कर्मचा-यांच्या खात्यात मार्चच्या पगारासोबत दिला जाणार आहे.