लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिलांना एप्रिल महिन्यात मिळणार ३ हजार, वाचा सविस्तर…

मुंबई : राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. मात्र या एप्रिल महिन्यात काही महिलांना ३००० रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तांत्रिक कारणांमुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही. त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. परंतु मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत. ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये ३००० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना २१०० रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुती कडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी दरमहा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे.
एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी?
एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेनी दिले स्पष्टीकरण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून अनेक महिलांना याचा फायदा होत आहे. मात्र, ही योजना बंद होईल, असे म्हटले जात होते. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.





