पुणे जिल्हा | शेवंतीच्या फुलांना चांगला बाजारभाव; शेतकरी समाधानी

लाखणगाव, (वार्ताहर) – सध्या शेवंतीच्या फुलांना चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेवंती उत्पादन शेतकऱ्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
१०० रुपये प्रति किलो याप्रमाणे दर मिळत असल्याने दहा किलोचे एक कॅरेट १००० ते ११०० रुपये या दराने विकले जात असून मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करून उभारलेल्या फुलांपासून सध्या चांगला दर मिळत असल्याने चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. शेवंतीला लग्नसराई व देवाच्या पुजेसाठीही मोठी मागणी असते.
सध्या अनेक तरकारी पिकांचे बाजार भाव वाढले आहे. त्याप्रमाणे फुलांचे ही बाजार भाव वाढले आहे. त्यामध्ये शेवंतीच्या फुलांना चांगल्या प्रकारे प्रतवारी नुसार ९०,१००, ११० रुपये प्रतिकीलो या दराने शेवंतीची फुले विकली जात आहे.
सध्या शेवंतीच्या फुलांना चांगला दर मिळत असल्याने दहा किलोच्या एका कॅरेट फुलांना १००० ते ११०० याप्रमाणे पैसे मिळत आहे. काठापूर बुद्रुक शेतकरी संदेश उल्हास करंडे यांनी एक एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड केली होती. त्यांना एकरी दीड लाख रुपये खर्च या फुलांच्या बागेसाठी आला आहे.
सध्या प्रति तोडा 60 ते 70 कॅरेट विक्रीला जात असून. 70 हजार रुपये एका तोड्याला या फुलांपासून मिळत आहेत. आतापर्यंत तीन तोडे झाले असून भांडवली खर्च वजा जाता ५० हजार रुपये नफा त्यांना मिळाला असून इथून पुढील कालखंडामध्ये या फुलांपासून अधिकचे उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे फूल शेतीपासून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. सध्या शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून उत्पन्न वाढीचा प्रयत्न करत आहे.
शेवंती फुलासाठी लहानपणी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यांची जपणूक करावी लागते. त्यामुळे अनेक शेतकरी शेवंतीची लागवड करत नाहीत.आणि त्यामुळे जे शेतकरी शेवंतीची लागवड करतात त्यांना चांगल्या पद्धतीने पैसे मिळतात. सध्या शेवंती फुलांपासून चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.
झाडांची खूप काळजी घ्यावी…
मंद सुवास देणारे फूल असणाऱ्या शेंवतीला अधिक ऊन चालत नाही. तापमान कमी असल्याच्या कालावधीत म्हणजे नोव्हेंबर ते माहे फेब्रुवारीदरम्यान भरपूर फुले येतात. तसेच शेवंतीच्या इतर काही जाती तापमान कमी असलेल्या जागी चांगल्या टिकतात व बहरतात. शेवंतीला योग्य पाण्याचा निचरा होणारी जागा लागते अथवा पॉटींग मिक्स लागते.
कुंडीत अथवा मातीत जास्त पाणी झाल्यास त्याची मुळे सडण्याची दाट शक्यता असते. शेवंतीचे झाडांचे दरवर्षी रिपॉटींग करावे. म्हणजे नव्याने फुटवे येतात. तसेच यास जिवामृत, कांदापाणी यांचा वापर करावा. शेणखत असल्यास उत्तम, याची काळजी मात्र खूप घ्यावी लागते.



