satara | ‘कोयने’त पर्यटनाला अच्छे दिन

कोयनानगर, (प्रतिनिधी) – कोयना परिसरातील पर्यटन विकासासाठी व स्थानिकांच्या प्रगतीसाठी शासनाने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. धरणाच्या भिंतीपासून पुढे पर्यटनक्षेत्र विकासासाठी तीन बोटिंग स्पॉट निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
कोयना नदीपात्रात हेळवाक, संगमनगर (धक्का), देवघर व निसरे बंधार्यावर बोटिंग स्पॉट होणार असून, पर्यटन विकास महामंडळाच्या पथकाने मंगळवारी कोयना ते संगमनगर (धक्का) दरम्यान रिव्हर राफ्टिंग करून, सर्वेक्षण केले.
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या उत्तरेस 40 किमी अंतरावर मुनावळे, ता. जावळी येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र विकसित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 381 कोटींच्या सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मान्यता दिली आहे.
या आराखड्यात पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी 67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाटण तालुका व कोयना भागातील पर्यटन विकासावर या निधीतून विविध ठिकाणे विकसित करण्यात येणार आहेत.
स्थानिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोयना नदीपात्रात हेळवाक, संगमनगर (धक्का) व कोयना दक्षिण भागातील देवघर आणि निसरे बंधार्यावर बोटिंग स्पॉट करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या पथकाने मंगळवारी कोयनानगर जुना पूल ते संगमनगर येथे रिव्हर राफ्टिंग करून हे ठिकाण बोटिंगसाठी योग्य आहे का, याचे सर्वेक्षण केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर बोटिंगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी करणार आहेत.
थंड हवेचे ठिकाण म्हणून परिसर विकसित व्हावा
कोयनेच्या दक्षिण भागातील देवघर येथील झोळाईचा डोह येथे बोटिंग स्पॉट करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने हाभाग प्रथम विकासाच्या प्रवाहात येणार आहे.
या परिसरात शिवकालीन भैरवगडावर राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ‘प्रतिचेरापुंजी’, अशी ओळख असलेले पाथरपुंज याच परिसरात असल्याने, थंड हवेचे ठिकाण म्हणून हा परिसर विकसित करण्यात यावा, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.





