गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण वाढणार; अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार नागेश्वरन यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – सध्या जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती कमालीची बिघडली आहे. अशा परिस्थितीत बरेच गुंतवणूकदार एक फायदेशीर वित्तीय मालमत्ता म्हणून सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आगामी बराच काळ अशीच परिस्थिती कायम राहण्याची जास्त शक्यता आहे, असे अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी सांगितले आहे.
आयआयएमए या संस्थेने आयोजित केलेल्या वार्षिक सुवर्ण व सुवर्ण बाजार परिषदेत बोलताना नागेश्वरन यांनी सांगितले की, सोने दागिने म्हणून आणि बचत म्हणून आतापर्यंत उपयोगी पडत आले आहे. आता आपल्या पोर्टफोलिओचे वैविधीकरण करण्यासाठी सोन्याचा वापर वाढत राहणार आहे. करोनानंतर आणि काही देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक पातळीवर पतधोरण नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत जागतिक पातळीवर पुन्हा पतधोरण असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत गुंतवणूक मालमत्ता म्हणून सोन्याचे आकर्षण वाढत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक चलन,पत आणि शेअर बाजारात कमालीचे अस्थिरता निर्माण झालेली आहे. अनेक घटना क्रमाचा यावर परिणाम होतो आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात पुन्हा संतुलित परिस्थिती कधी निर्माण होईल याबद्दल कोणीही कसलेही भाकीत सध्या करू शकत नाही.
गेल्या तीन महिन्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर 200 डॉलर प्रति औंसाने म्हणजे 8% वाढून 2,900 डॉलरच्या पुढे गेला आहे. याच कालावधीत भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आठ टक्क्यांनी कमी झाले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
2002 मध्ये सोन्याचे मूल्य केवळ 250 ते 290 डॉलर प्रति औंस होते. या 24 वर्षांच्या काळात सोन्याच्या मूल्यात दहा पटीने वाढ झाली आहे. यावरून आधुनिक काळात गुंतवणूक म्हणून सोने किती फायदेशीर ठरत आहे, याचा प्रत्यय येतो. भारतात बहुतांश सोने आयात केले जाते. त्यामुळे सोन्याबाबत सरकार आणि नागरिक विविध पातळ्यावर विचार करीत असतात.
एकूण जागतिक परिस्थिती पाहिल्यानंतर सर्वच संदर्भात सोन्याचे महत्व वाढत जाणार आहे. भारतामध्ये दागिने घालणे सांस्कृतिक दृष्टया प्रतिष्ठेचे मानल जाते. त्याचबरोबर सोने घेऊन ठेवल्यानंतर कुटुंबासाठी भविष्यकाळात मदत म्हणून याचा उपयोग होतो असे समजले जाते. आता एक गुंतवणूक साधन म्हणून आणि आपल्या पोर्टफोलिओत वैविध्यकरणाचा भाग म्हणून सोन्याचे मूल्य भारतात वाढत आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात सोने आहे असे समजले जाते. मात्र याचे मूल्यांकन सध्यातरी करणे फार अवघड आहे. या सोन्याचा उपयोग या नागरिकांच्या सांस्कृतिक भावनां न दुखावता कसा करता येऊ शकेल यासंदर्भात सरकारकडून गेल्या अनेक वर्षापासून धडपड चालू आहे. त्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 2015 मध्ये सरकारने यासाठी गोल्ड मोनेटायझेशन योजना सुरू केली आहे. या अतर्गत लोक ठेव म्हणून सोने ठेवू शकतात आणि त्यावर त्यांना व्याज मिळू शकते. सोन्याची आयात कमी व्हावी यासाठी सरकार अशा प्रकारचे प्रयत्न आगामी काळात करत राहणार असल्याचे दिसून येते.
विविध देशावरील कर्जाचे राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन कर्ज हे जुने कर्ज फेडण्यासाठी घेतले जाते. यामुळे महागाई वाढत राहण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत सोन्यासारखे गुंतवणुकीचे साधन नागरिकांना आधार वाटत आहे असे ते म्हणाले.





