सोने 1 लाखांचा टप्पा गाठणार का? किंमत वाढत असताना यात गुंतवणूक करावी का? वाचा

Gold Investment | ‘सोने’ ही भारतीयांसाठी गुंतवणुकीसोबतच भावनिक बाब देखील आहे. भारतीय नागरिकांकडून गुंतवणुकीऐवजी दागिने म्हणून सोने खरेदी करण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, मागील वर्षभरात सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. सद्यस्थितीमध्ये या पिवळ्या धातूच्या प्रती 10 ग्रॅमची किंमत 90 हजारांच्या घरात पोहोचली आहे. लवकरच हा आकडा 1 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असतानाही खरेदीमध्ये कोणतीही घट झालेली नाही. गुंतवणुकीसह लगीन सराईमुळे दागिन्यांच्या स्वरुपातही सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. मात्र, सोन्याच्या किंमतीत वाढ होत असताना यात खरचं गुंतवणूक करायला हवी का? सोन्याची किंमत नक्की कशी ठरते? दागिन्यांव्यतिरिक्त सोन्यात गुंतवणूक करण्याचे कोणते पर्याय आहेत? या प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊयात.
सोन्याच्या किंमतीत मागील 10 वर्षात प्रचंड वाढ
मागील 10 वर्षात सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या भारतीय बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास 89 हजार रुपये आहे. मागील वर्षभरात किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. वर्ष 2015 मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा जवळपास 26,500 रुपये एवढी होती. तर 2020 मध्ये हा आकडा जवळपास 48,500 रुपयांवरून पोहोचला होता. तर आता प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90 हजारांच्या घरात आहेत. म्हणजेच, 5 वर्षात किंमत दुप्पटीने वाढली आहे.
सोने 1 लाख रुपये किंमतीचा टप्पा गाठणार का?
सोन्याच्या किंमतीचा आलेख पाहिल्यास हा नेहमीच चढत्या दिशेने गेलेला दिसून येतो. सोन्याच्या किंमतीत टप्प्याटप्प्याने वाढच होताना दिसून आली आहे. मागील 10 वर्षात सोन्याच्या किंमतीत वर्षाला सरासरी 2 ते 3 हजार रुपयांची वाढ दिसून आली आहे. कोव्हिड-19 महामारीनंतर हा आकडा झपाट्याने वाढ आहे. त्यामुळे सोने वर्षभरात प्रति तोळा 1 लाख रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
सोन्याची किंमत नक्की ठरते कशी?
सोने हे आजही सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय समजले जाते. जगभरात कितीही अस्थिरता असली तरीही सोन्याच्या किंमती स्थिर राहतील असा विश्वास गुंतवणूकदारांकडून व्यक्त केला जातो. याशिवाय, प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकांकडूनही शेकडो टन सोन्याची साठवणूक केली जाते.
सोन्याची किंमत ठरण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मात्र, यातील प्रमुख कारण जगभरातील व्यापार स्थिती, महागाई आणि सोने खरेदी-विक्री हे असते. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील मागणी आणि पुरवठा, आर्थिक परिस्थिती आणि प्रचलित व्याजदराच्या आधारावर या पिवळ्या धातूची किंमत निश्चित होते.
लंडन बुलियन मार्केट हे जगभरात सोन्याची किंमत निश्चित करते. तर देशात भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) दररोजच्या सोन्याचे दर ठरवले जातात. IBJA सदस्यांमध्ये देशातील सर्वात मोठे सोनार व्यापाऱ्यांचा समावेश असतो. सोन्याची किंमत भारतात पुरवठा आणि मागणी, आयात शुल्क, रुपयाचा डॉलरमध्ये रूपांतर दर यावरून ठरवली जाते. सध्या जगभरातील विविध देशात सुरू असलेली युद्ध, चीन-अमेरिका व्यापार युद्ध, महागाई यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होत चालली आहे.
किंमत वाढत असताना सोन्यात गुंतवणूक करावी का?
सोन्याच्या किंमतीत टप्प्याटप्प्याने वाढ होणार हे निश्चित आहे. मागील 10 वर्षांचा विचार करत सोन्याची किंमत वाढतच गेलेली दिसून येते. त्यामुळे यात गुंतवणूक करणे कधीही चांगला निर्णय ठरतो. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी विविध गोष्टींचा विचार करायला हवा.
सोने हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय आहे. तुम्ही जर 10-20 वर्षांच्या उद्देशाने यात गुंतवणूक करत असाल तर नक्कीच याबाबत विचार करू शकता. मात्र, अल्पकालावधीसाठी यात गुंतवणूक करत असाल तर हा चांगला पर्याय नाही. तुम्ही दागिने किंवा फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी इतरही पर्यायांचा विचार करू शकता.
गुंतवणुकीचे इतर पर्याय
भारतात सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे दागिने खरेदी करणे असे समीकरण पाहायला मिळते. मात्र, हेच दागिने मोडायला गेल्यावर किंमतीत मोठी घट होते. याशिवाय, अशा दागिन्यांसाठी एकरकमी पैसे द्यावे लागतात. त्या तुलनेत सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी इतर पर्यायांचाही विचार करू शकता. तुम्ही डिजिटल गोल्ड, सॉव्हरन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड्समध्येही गुंतवणूक करू शकता.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





