Gold-Silver Rates: आखाती युद्ध मंदावण्याची शक्यता वाढल्यानंतर लगेच खनिज तेलाचे दर कमी झाले.त्याचबरोबर अमेरिकन डॉलर इतर चलनांच्या तुलनेत कमकुवत झाला. अशा परिस्थितीत बरीच गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळाल्यामुळे या दोन धातूच्या दरात सोमवारी वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 2,300 रुपयांनी म्हणजे 1.52 टक्क्यांनी वाढवून 1 लाख 53 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर पाच हजार रुपयांनी म्हणजे 2.11 टक्क्यांनी वाढून दोन लाख 42 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. खनिज तेल, डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यातील गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळत असल्यामुळे या दोन धातूचे दर वाढण्यास मदत झाली असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात या दोन धातूच्या घरात बरीच घट झाली होती. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी खरेदी केली. हेही वाचा – RBI MPC Meeting: तेलदरवाढीचा महागाईवर दबाव; व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता या घडामोडीमुळे जागतिक बाजारातही या दोन धातूचे दर वाढले. जागतिक बाजारात चांदीचा दर 0.5 टक्क्यांनी वाढून 73.37 डॉलर व सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून 4,682 या पातळीवर गेला होता. ज्या आखातातील सकारात्मक घडामोडीमुळे या दोन धातूच्या दरात वाढ झाली आहे, त्या आखातातील परिस्थिती अजूनही लवचिक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे आखातातील घडामोडीकडे बारीक लक्ष असणार आहे. त्या आधारावर आगामी काळात दर ठरू शकतात. जर युद्ध थांबण्याची शक्यता वाढली तर सोने आणि चांदीचे दर वाढू शकतात. मात्र युद्ध लांबत गेल्यास या दोन धातूच्या दरावर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे समजले जाते. मात्र जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे या दोन धातूचे दर लघु पल्ल्यात सध्याच्या पातळीवर राहू शकतात.