Gold-Silver Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची बातमी; वाचा आजचे भाव

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात चांगलीच चढउतार होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज भारतीय बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्याचे समोर आले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव किंमती 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. ही 6 सत्रात पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर चांदीच्या किंमतीतही 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
मागच्या सत्रात सोन्याचे दर 1.2 टक्क्यांनी तर चांदी 2.8 टक्क्यांनी वधारली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 56,200 च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचलं होतं. त्यानंतर यंदाच्या वर्षात सोन्याच्या किंमती खूपच अस्थिर असल्याचं पाहायला मिळतं. आता सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकडून 9,000 रुपयांनी घसरल्या आहेत.
सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर फेब्रुवारीमधील सोन्याचा वायदा भाव 0.13 टक्क्यांनी घसरून 47,195 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर एक किलो चांदीची किंमत 0.28 टक्क्यांनी घसरून 68,593 रुपये झाली.
2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये शुल्कात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे दर झपाट्याने वाढले होते.





