Gold Silver Prices: आखाती तणाव कमी होण्याचे संकेत; सोनं ₹1.55 लाखांवर, चांदीतही मोठी उसळी
Gold Silver Prices:

Gold Silver Prices: आखातातील तणाव कमी होण्याची शक्यता वाढल्यामुळे विविध बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सराफात सोन्याचा दर 3 हजार 500 रुपयांनी म्हणजे 2.3 टक्क्यांनी वाढून 1 लाख 55 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
दिल्ली सराफात चांदीचा दर 9,000 रुपयांनी म्हणजे 3.8 टक्क्यांनी वाढून 2 लाख 46 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की आखातातील तणाव कमी होणार आहे. त्यामुळे आता डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यातील गुंतवणूक इतर क्षेत्राकडे काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
खनिज तेलाचे दर एक महिन्यापासून जास्त पातळीवर आहेत. त्याचबरोबर आगामी काही काळ तरी ते जास्त पातळीवर राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून सामना करण्यासाठी गुंतवणूकदार विविध वित्तीय साधनाचा वापर करण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात चार टक्क्यापर्यंत वाढ झाली. मात्र आखाजातील परिस्थिती कधीही बिघडू शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार कमालीचे सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर दोन टक्क्यांनी म्हणजे 76 डॉलरने वाढून 4,743 डॉलर झाला. चांदीचा दर किंचित कमी होऊन 75 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.




