Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; पाहा आजचे ताजे दर
Gold-Silver Price Today: दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 1,300 रुपयांनी म्हणजे 0.83 टक्क्यांनी वाढून 1 लाख 58 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला.

Gold-Silver Price Today: भूराजकीय आणि व्यापार युद्ध या कारणामुळे सोने आणि चांदीत गुंतवणूक कमी अधिक प्रमाणात चालूच आहे. अशा परिस्थितीत डॉलर कमकुवत झाल्यामुळे या दोन धातूमधील गुंतवणूक वाढली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. परिणामी दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 1,300 रुपयांनी म्हणजे 0.83 टक्क्यांनी वाढून 1 लाख 58 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला.
गुंतवणूक म्हणून चांदी खरेदी होत असतानाच औद्योगिक क्षेत्राकडूनही चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे चांदीच्या दरात गेल्या एक वर्षापासून जास्त वाढ होत आहे. सोमवारी चांदीचा दर सहा टक्क्यांनी म्हणजे 17 हजार रुपयांनी वाढून 2 लाख 72 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, डॉलर इंडेक्स सोमवारी 0.30 टक्क्यांनी घसरून 97 अंकावर आला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर या दोन धातूची खरेदी होत आहे. व्यापारी युद्ध पूर्णपणे संपुष्टात येत नाही तोपर्यंत या दोन धातूच्या दरात वाढ होत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक स्थूल अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयांचा परिणाम होत असल्यामळे एकूणच सोने-चांदीसाठी पूरक वातावरण गेल्या एक वर्षापासून निर्माण झाले आहे. यामध्ये नजीकच्या भविष्यात खंड पडण्याची शक्यता कमी आहे. जागतिक बाजारात चांदीचा दर 2.19 टक्क्यांनी म्हणजे 2.81 डॉलरने वाढून 80.21 डॉलर प्रति औंसावर गेला. तर जागतिक बाजारात सोन्याचा दर एक टक्क्याने वाढून 5,012 डॉलर प्रति औंसावर गेला आहे.
हेही वाचा – Q3 results 2026: बँकिंग क्षेत्रात भरभराट; 12 सरकारी बँकांचा नफा 52,603 कोटींवर
चीनकडून खरेदी चालूच –
चीन सरकार सोन्याची एकतर्फी खरेदी करीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार चीनने सलग पंधराव्या महिन्यात सोन्याची खरेदी केली आहे. यामुळे सोन्याचे दर गेल्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येते. इतर देशाच्या रिझर्व बँक सोन्याची खरेदी करीत आहेत.





