Gold Price : सोनं दीड लाखांच्या खाली! खरेदीसाठी हीच योग्य वेळ? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…
Gold Price : लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जे ग्राहक योग्य संधीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही दरातील घसरण काहीशी दिलासादायक ठरू शकते. मात्र, जागतिक घडामोडींमुळे बाजारात अजूनही अस्थिरता असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच खरेदीचा विचार करावा.

Gold Price : जागतिक पातळीवरील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर यामुळे सध्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ३,५०० रुपयांपेक्षा जास्त घसरून १,४७,४८९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. यामुळे सोनं पुन्हा एकदा १.५० लाख रुपयांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली घसरलं आहे.
गेल्या महिन्यात, म्हणजेच १३ मे २०२६ रोजी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क (इम्पोर्ट ड्युटी) वाढवल्यानंतर सोन्याने १,६४,५०० रुपये प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर सोन्याच्या भावात सुमारे ९ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे.
बाजार तज्ज्ञांचा अंदाज काय?
मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, सोन्यासाठी सध्या १,४५,००० रुपये हा अत्यंत महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल (किमान पातळी) आहे. तर दुसरीकडे, १,५५,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर मोठा रोख (रेझिस्टन्स) दिसून येत आहे. जोपर्यंत सोनं ही पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत बाजारात मंदीचे सावट राहू शकते.
डॉलर मजबूत झाल्याने सोन्याची चमक कमी:
जियोजित इन्व्हेस्टमेंट्सचे कमोडिटी रिसर्च प्रमुख हरीश व्ही. यांनी सांगितले की, “अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मजबूत आकडेवारीमुळे डॉलर वधारला आहे. परिणामी, तिथे व्याजदर दीर्घकाळासाठी चढे राहण्याची शक्यता वाढली आहे. बॉण्ड यील्डमधील वाढीमुळे सोन्यासारख्या बिगर-व्याजी गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल कमी झाला आहे.”
आयात शुल्काचा तात्पुरता प्रभाव:
एलकेपी (LKP) सिक्युरिटीजचे व्हीपी जतिन त्रिवेदी यांच्या मते, “१३ मे रोजी आयात शुल्क वाढल्यानंतर झालेली दरवाढ ही केवळ देशांतर्गत खर्च वाढल्यामुळे होती, बाजारातील कोणत्याही मजबूत सुधारणेमुळे नव्हती. आता बाजार पुन्हा जागतिक घडामोडींवर लक्ष केंद्रित करत असल्याने किमती पूर्वपदावर येत आहेत.”
दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीची मोठी घसरण –
बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव चांगलेच गडगडले. स्थानिक सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं ४,३०० रुपयांनी म्हणजेच सुमारे ३ टक्क्यांनी घसरून १,५६,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर (सर्व करांसह) आलं आहे. यापूर्वीच्या सत्रात सोनं १,६०,३०० रुपयांवर बंद झालं होतं.
सोन्यासोबतच चांदीलाही मोठा फटका बसला आहे. चांदीची किंमत १०,००० रुपयांनी म्हणजेच सुमारे ४ टक्क्यांनी घसरून २,४५,७०० रुपये प्रति किलोग्रामवर (सर्व करांसह) आली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदी २,५५,७०० रुपयांवर बंद झाली होती.
लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जे ग्राहक योग्य संधीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही दरातील घसरण काहीशी दिलासादायक ठरू शकते. मात्र, जागतिक घडामोडींमुळे बाजारात अजूनही अस्थिरता असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच खरेदीचा विचार करावा.





