पाकिस्तानमध्ये सापडली सोन्याची खाण

लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सोन्याची खाण सापडल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. या खाणीमध्ये ७०० अब्ज पाकिस्तानी रुपये किंमतीच्या सोन्याचा साठा असल्याचे मानले जाते आहे. पंजाबमधील अटोक जिल्ह्यात आम्हाला २.८ दशलक्ष तोळे सोने सापडले आहे, असे पंजाबचे खाण आणि खनिज मंत्री सरदार शेर अली गोरचानी यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
गेल्या वर्षी पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने अटोकमधील सोन्याच्या साठ्यांचा अभ्यास सुरू केला आणि तेथे मोठ्या प्रमाणात सोने सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत ६००-७०० अब्ज रुपये आहे. सरकारने सोन्याच्या साठ्याच्या लिलावासाठी तात्काळ नियम तयार केले आहेत आणि ही प्रक्रिया एका महिन्यात सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने या संदर्भात अटोकमधील १२७ ठिकाणचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.





