सोने-चांदीचे भाव घसरले, पण अनिश्चिततेमुळे पुन्हा वाढीची शक्यता; आजचा दर जाणून घ्या

नवी दिल्ली – अमेरिकेच्या पतधोरणात डिसेंबरपूर्वी दोन वेळा व्याजदर कपात करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर सोने आणि चांदीची मागणी कमी होऊन या दोन धातूच्या दरात तीन दिवसानंतर काही प्रमाणात घट नोंदली गेली. मात्र इतर कारणामुळे जागतिक परिस्थिती अनिश्चित असल्यामुळे या दोन धातूचे दर मध्यम पल्ल्यात उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर तीनशे रुपयांनी कमी होऊन 91,650 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर दीड हजार रुपयांनी कमी होऊन 1 लाख 2 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
अमेरिकेच्या पत धोरणानंतर जागतिक वायदे बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात बर्याच प्रमाणात घट झाली. त्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये या दोन धातूच्या घरात घट झाली असल्याचे विश्लेषकांनी सागितले. मात्र असे असले तरी रशिया- युक्रेन युद्ध अजून समाप्त झालेले नाही. मध्यपूर्वेत अजूनही संघर्ष चालू आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात अमेरिका विविध देशाविरोधात आयात शुल्क वाढविणार आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढत राहतील असे बर्याच विश्लेषकांनी सांगितले.




