Silver and Gold Price: अमेरिका-वेनेझुएला तणावाचा फटका; सोने-चांदीच्या दरात मोठी दरवाढ, पाहा आजचे भाव

Silver and Gold Price: अमेरिका आणि वेनेझुएला यांच्यातील वाढत्या राजकीय तणावाचे सावट जागतिक बाजारपेठेसह भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. या भू-राजकीय अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याने आज दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी झेप पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दराने १,४०,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
सोन्याच्या दरात ९६० रुपयांची वाढ
‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात ९६० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा भाव १,४०,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद होताना हा दर १,३९,४४० रुपये होता.
चांदी २,६०० रुपयांनी महागली
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज जोरदार उसळी पाहायला मिळाली. दिल्लीत चांदीचा दर २,६०० रुपयांच्या वाढीसह २,४४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. शुक्रवारी चांदी २,४१,४०० रुपये प्रति किलोवर स्थिरावली होती.
दरवाढीची मुख्य कारणे काय?
भू-राजकीय तणाव: अमेरिकेने वेनेझुएलावर केलेल्या कारवाईमुळे जागतिक स्तरावर राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा काळात गुंतवणूकदार शेअर बाजारापेक्षा सोन्याला अधिक पसंती देतात.
ट्रम्प यांची विधाने: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबिया आणि मेक्सिकोबाबत घेतलेली आक्रमक भूमिका लॅटिन अमेरिकेत अस्थिरता निर्माण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार: जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव ८७.७४ डॉलरने वधारून ४,४१८ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे, तर चांदी ७५ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे.
“भू-राजकीय जोखीम वाढल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून बुलियन मार्केटला (सोने-चांदी) बळ मिळाले आहे. वेनेझुएला विरुद्ध अमेरिकेची कारवाई आणि प्रादेशिक अस्थिरतेच्या चिंतेमुळे मागणीत वाढ झाली आहे,” असे एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी नमूद केले.
कोटक म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सतीश दोंडापती यांच्या मते, मजबूत औद्योगिक मागणी आणि पुरवठ्याबाबतच्या चिंतांमुळे चांदीच्या किमती येणाऱ्या काळातही उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.




