शरद पवारांनी संधी दिली तर वडिलांविरोधात लढणार; ‘या’ आमदाराच्या मुलाने विधानसभेसाठी ठोकला शड्डू

नाशिक : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांनी संधी दिली तर वडिलांविरोधात निवडणूक लढवण्यास मी तयार आहे असे वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केले आहे. गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या नाशिकच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळ झिरवाळ हे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र आहेत.
काय म्हणाले गोकुळ झिरवाळ?
माझ्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांकडे बघून झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय. मी लोकसभा निवडणूक देखील लढण्यास इच्छुक होतो. मी महाविकास आघाडीतच आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे. माझी छाती पडली तरी शरद पवार दिसतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय. कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं असतं. विधानसभेची निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे.नरहरी झिरवाळांच्या विरोधात लढण्याचीदेखील माझी इच्छा आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढण्यास तयार आहे असे गोकुळ झिरवाळ म्हणाले आहेत.
दिंडोरीतून निवडणूक लढवणार?
नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत गोकुळ झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झिरवाळ काही वेगळा निर्णय घेतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





