सोन्यारूपाची गौराई… घरोघरी आगमन; चैतन्यदायी वातावरण

पुणे -“सोन्या रुप्याच्या पावलांनी ये, आयुरारोग्य, धनसंपत्ती, सुखशांती घेऊन ये’, असे म्हणत घरोघरी काल दुपारी महिलांनी लाडक्या गौराईंचे थाटात, परंपरा जपत आगमन साजरे केले. गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीपासून घरात गौरायांचे आगमन होते. गौरींची पूजा केली जाते. गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो अशी प्रार्थना आगमनानंतर महिलांनी गौराईंकडे केली.
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी, धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींची स्थापना केली जाते. पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो. माहेरवाशिणींना हा मान दिला जातो. आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात.
हातात गौरी घेऊन आलेल्या भगिनीचे पाय दुधाने किंवा पाण्याने धुवून आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. घरात प्रवेश करताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे सुहासिनींच्या हस्ते घरात आणले जातात. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत केले जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवल्या जातात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे, असे संबोधतात.
आज पूजनाचा दिवस…
गौरी पूजन शुक्रवारी (दि.22) आहे. हा दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. दुपारी 12:00 वाजेपर्यंत गौराईंना नैवेद्य दाखवला जाणार आहे. या दिवशी गौराईंच्या समोर विविध पदार्थ, फळे यांची आरास मांडली जाते. हल्ली या आरासाचीही स्पर्धा अनेकठिकाणी घेतल्या जातात आणि आकर्षक बक्षीसे दिली जातात. हल्ली गौराई आरासांमध्येही अनेक “व्हरायटी’ आल्या असून, अनेक प्रकारची सजावट यामध्ये केली जाते.





