Glass Skywalk Lonavala: पर्यटकांसाठी मोठी खूशखबर! टायगर-लायन्स पॉईंटवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लास स्कायवॉक होणार
Glass Skywalk Lonavala: हवेत तरंगणारा १२५ मीटरचा स्कायवॉक अन् अत्याधुनिक नागरी सुविधा; पुढील दोन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

Glass Skywalk Lonavala – शहरातील प्रसिद्ध टायगर आणि लायन्स पॉईंट परिसराचा कायापालट करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वेगाने पावले उचलली आहेत. या परिसराचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन केंद्राच्या रूपात विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत १२५ मीटर लांबीचा ग्लास स्कायवॉक उभारण्यात येणार असून, त्यात २३ मीटरचा कॅन्टिलिव्हर भाग असणार आहे.
सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्कायवॉकसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरएफपी निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पाला तांत्रिक सहमती मिळाल्याने लवकरच जागतिक निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी ८२२.५९ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे.
हा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत राज्य महामार्ग क्रमांक ११० वरील सुमारे ११ किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. विविध टप्प्यांमध्ये रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात ४५ मीटर रुंदीचा रस्ता विकसित केला जाणार आहे.
त्यामध्ये ११ मीटरचा उड्डाणपूल, दोन्ही बाजूंना ८.५० मीटरचे सर्व्हिस रोड आणि ६.५० मीटरचा पदपथ उभारण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अत्याधुनिक नागरी सुविधांची आखणी करण्यात आली आहे. पवना धरणातून प्रकल्पस्थळी १८ किलोमीटर लांबीची पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्यात येत आहे. २२ केव्ही क्षमतेची वीज यंत्रणा आणि ट्रान्सफॉर्मर रूमही उभारण्यात येत आहे.
पायाभूत सुविधांच्या कामासाठी १८४.४८ कोटी रुपयांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. कामाची मुदत २४ महिने निश्चित करण्यात आली आहे. सध्या भुशी धरण ते आयएनएस शिवाजीदरम्यान रस्ता रुंदीकरण आणि युटिलिटी क्रॉसिंगची कामे सुरू आहेत. प्रकल्पाच्या मार्गातील भूसंपादन आणि विविध परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे.
वन विभागाच्या हद्दीतून पाणीपुरवठा पाइपलाइन नेण्यासाठी उपवनसंरक्षकांकडे परवानगी मागण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक २०.९० हेक्टर पर्यायी वनजमिनीचा प्रस्ताव पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथील जमिनीसाठी महसूल विभागाकडे सादर करण्यात आला आहे.






