Nana Patole : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या मुद्याला उत्तर दिले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नाना पटोले यांनी मांडला होता.
उद्योगधंदे, ग्रामीण विकास, मराठवाडा, विदर्भाच्या विकासाचा मुद्दा, पाणी समस्या यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची भूमिका मांडली. आपण(देवेंद्र फडणवीस)जाहीरनाम्यामध्ये आणि भाषणांमध्ये शेतकरी कर्जमाफी घोषणा केली होती. मला अपेक्षित आहे की, याच सभागृहात आपण सरसकट कर्जमाफी करून मार्चपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करावी, अशी अपेक्षा मी बाळगतो असे नाना पटोले विधानसभेत म्हणाले.
यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितले आहे, ते पूर्ण करू. निश्चितपणे पूर्ण करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितले आहे, ते ते आम्ही पूर्ण करू कर्जमाफीही त्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.





