Kenya News : केनियामध्ये मुलींच्या शाळेची जाळपोळ; ८ विद्यार्थिनींना अटक
वसतिगृहाला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीमध्ये १६ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तर अन्य डझनभर विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या.

Kenya News : केनियामध्ये मुलींच्या शाळेच्या वसतिगृहाची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ८ विद्यार्थिनींना अटक केली आहे. वसतिगृहाला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीमध्ये १६ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता.
तर अन्य डझनभर विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. मुलींच्या निवासी शाळेच्या वसतिगृहाची जाळपोळ करण्यामागील हेतू अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही.
मध्य केनियातील उटुमिषी गर्ल्स स्कूलमध्ये झालेल्या संशयित जाळपोळीच्या हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी केल्याप्रकरणी ८ मुलींना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस दलातील गुन्हेगारी तपास संचालनालयाने म्हटले आहे.
या आगीमध्ये ७९ मुली जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी गुरुवारी शाळेतील ३० मुली, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली होती. तसेच सीसीटिव्हीचे फुटेजही तपासले.
शाळेचे व्यवस्थापन मंडळ बरखास्त करण्यात आले होते आणि सुरक्षा नियमावलीचे पालन न केल्याबद्दल मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे शिक्षण मंत्री ज्युलियस ओगाम्बा यांनी शुक्रवारी सांगितले.
वसतिगृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनी होत्या. तसेच एकच प्रवेशद्वार बंद होते. ज्या शिक्षकांना या जाळपोळीच्या कटाची माहिती होती त्यांच्यावरही शिस्तभंगाची करावाई केली जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले. मृत विद्यार्थिनींची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणी केली जाणार आहे.





