न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू होत असल्याचे “युनिसेफ’ या बालकांसाठीच्या निधी कार्यक्रमाने स्वागत केले आहे. मात्र त्याबरबरच अफगाणिस्तानमधील शाळांमधून मुलींना वगळले जाऊ नये या मुद्द्यावरही विशेष भर दिला आहे. “युनिसेफ’च्या अध्यक्षा हेरिनेटा फोर यांनी प्रसिद्धस दिलेल्या एका निवेदनात मुलींच्या शिक्षणाबद्दलची चिंता व्यक्त केली आहे.
अफगाणिस्तानमधील अनेक मुलींना यावेळी शाळेत उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाउ शकणार नाही, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमधील राजकीय संकट निर्माण होण्यापूर्वीच तब्बल 42 लाख मुले शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेली होती. यातील 6 टक्के मुली आहेत. मुले शाळेत उपस्थित राहू शकणार नाहीत, ही त्यांच्यासाठी शिक्षणाची मुकलेली संधीच असणार आहे, असेही हेरिनेटा फोर यांनी म्हटले आहे.
शाळा पुन्हा सुरू होण्याची घोषणा जरी तालिबानकडून केली गेली असली तरी केवळ मुलांना शाळेत उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. मुलींसाठी शाळा कधीपासन सुरू केल्या जाणार आहेत, याचा कोणताही उल्लेख नाही. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता मिळवल्यानंतर मुलींनाही शिक्षण दिले जाईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र सध्याची कृती मात्र त्याच्या बरोबर विरुद्ध आहे, याकडे फोर यांनी लक्ष वेधले.